• कडोली ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन 
  • उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना सादर केले निवेदन  

बेळगाव / प्रतिनिधी 

मतिमंद तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करावी, यासाठी कडोली (ता. बेळगाव) येथील ग्रामस्थांनी गुरूवार (दि. १८) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तत्पूर्वी कडोली गावातील सर्व व्यावसायिकांनी स्वेच्छेने दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन निदर्शने करत संताप व्यक्त केला. तसेच गावात वारंवार अशांतता निर्माण करणाऱ्या त्या नराधमाच्या कुटुंबाला गावातून हद्दपार करावे, या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी  यांना सादर केले. 

काकती पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कडोली येथे बुधवार (दि. १७) रोजी एका २२ वर्षीय मतिमंद हिंदू तरुणीवर गावातीलचं मुस्लिम समाजाच्या ३० वर्षीय तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणीचे आई - वडील शेतात गेले असता आरोपीने घरात घुसून तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी मुलीचा आरडाओरडा ऐकून तिच्या काकाने येऊन त्या तरुणाला बेदम मारहाण केली. यावेळी  बेशुद्ध झाल्याचे नाटक करून आरोपीने तेथून पळ काढला होता.  या घटनेनंतर तरुणीच्या काकांनी तरुणीसह काकती पोलीस स्थानक गाठून तक्रार दिली. पोलिसांनी विशेष पथक तयार करून काही तासांतच आरोपीला अटक केली. तसेच तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.  

यावेळी कडोली येथील ग्रामस्थांनी सांगितले, गावातील आझाद गल्ली येथील समीर अब्बास धामणेकर या मुस्लिम समाजातील तरुणाने मतिमंद तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सदर तरुण कडोली गावात वारंवार अशांतता निर्माण करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने गावातील एका हिंदू तरुणाचीही हत्या केली होती. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे  या तरुणावर कडक कारवाई करून त्याच्या कुटुंबियांना गावातून हाकलून देण्याची कारवाई करावी, जेणेकरून गावात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

याबाबत प्रसारमाध्यमांना अधिक माहिती देताना केपीसीआयएस सदस्य मलगौडा पाटील म्हणाले, गावात घडलेल्या घटनेनंतर जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार पीडित तरुणी मुलगी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे असे त्यांनी सांगितले. या आंदोलनात कडोली ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.