बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावात पीओपी गणेशमूर्तीवर बंदी आणि गणेशोत्सवावर निर्बंध न घालता उत्साहात साजरा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ व बेळगाव मूर्तिकार असोसिएशनच्यावतीने सोमवार (दि.१) जुलै रोजी जिल्हापालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
बेळगाव शहरात होणाऱ्या श्री गणेशोत्सवाला शतकांचा इतिहास आहे. शहरात घरगुती आणि सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या पवित्र गणेशमूर्ती कोणत्याही नैसर्गिक तलावात विसर्जित केल्या जात नाहीत. गणेशविसर्जनासाठी बेळगाव महापालिकेकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर ते पाणी विसर्जन कुंड्यांमध्ये स्वच्छ केले जाते. तेथे कोण पाणी पीत नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणे बेळगावातही पीओपी गणेशमूर्तीवर बंदी घालण्याची गरज नाही. बेळगावात जलप्रदूषण नाही.
२०१६ मध्ये शासनाच्या आदेशानुसार मातीपासून तयार केलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मात्र बेळगावात गणेशोत्सवादरम्यान फटाके फोडले जातात. तसेच डॉल्बीचा वापर केला जातो. त्यामुळे मूर्तींची हानी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच बेळगावात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मातीचा तुटवडा आहे.या सर्व बाबी सार्वजनिक बांधकाम व जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यापर्यंत सार्वजनिक मध्यस्थी श्री गणेशोत्सव महामंडळ व बेळगाव मूर्तिकार असोसिएशनच्या माध्यमातून पोहचविण्यात आल्या.
ही विनंती मान्य करून जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगावात पीओपी गणेशमूर्तींना बंदी नसल्याचे सांगितल्याने मूर्तीकारांना दिलासा मिळाला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुसकर यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली.
यावेळी रणजीत चव्हाण पाटील, सतीश गौरगोंडा, सागर पाटील, उदय पाटील, विकास कलघटगी, बेळगाव मूर्तिकारअसोसिएशनचे विनायक मनोहर पाटील, विक्रम पाटील उपस्थित होते.
0 Comments