• टी-२० विश्वचषकात पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक 

त्रिनिदाद : टी-२० विश्वचषक २०२४  स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ९ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. दक्षिण आफ्रिकेने प्रथमच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा संघ ११.५ षटकांत केवळ ५६ धावांवर सर्वबाद झाला.

या काळात मार्को यानसेन आणि तबरेझ शम्सी यांनी संघाकडून सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने ८.५ षटकांत १ गडी गमावत ६० धावा करून विजय मिळवला.