- दोन लाखांच्या कामासाठी घातला ३०.५० लाखांचा गंडा
बेळगाव / प्रतिनिधी
मनरेगा प्रकल्पांतर्गत नदीपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी लागणाऱ्या २ लाखांच्या बिलाऐवजी ३५ लाखांचे बिल काढून पीडीओ आणि ग्रा.पं. अध्यक्षांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप बेळगाव तालुक्यातील कडोली गावात ऐकायला मिळत आहे. तसेच नवीन खासगी ले-आऊट बांधण्यासाठी आवश्यक असलेली सवलत देण्यासाठी अधिक रकमेची मागणी केली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. मनरेगा प्रकल्पांतर्गत बेळगाव तालुक्यातील कडोली येथे मार्कंडेय नदीपर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. यासाठी केवळ दोन लाख रुपये खर्च आला मात्र ग्रा. पं. अध्यक्ष आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ३०,५०,०००/- रुपयांची बिले काढून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. गावाच्या विकासासाठी मंजूर झालेल्या अनुदानाबाबत विचारणा केली असता पंचायत सदस्यांनी मौन बाळगले आहे.
सर्व सदस्यांना अंधारात ठेवून शासनाने पुरवठादार ट्रॅक्टर बिल म्हणून मंजूर केलेल्या साडेतीस लाखांपैकी केवळ दोन लाख रुपये खर्च केले व उर्वरित रक्कम स्वत:साठी वापरल्याचा आरोप पंचायतीच्या सदस्यांनी केला आहे.
जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी भ्रष्ट पीडीओ व अध्यक्षांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शासनाला दिले. यावेळी राजू व्ही. मायण्णा, राजू कुट्र्रे, सुनील पवनोजी, दत्तात्रेय सुतार, प्रेमा नरोटी, रेखा नरोटी, रेखा सुतार, शोभा पाटील आदी सदस्य उपस्थित होते.
0 Comments