• मृणाल हेब्बाळकर यांच्यासह अण्णासाहेब जोल्लेंना पराभवाचा धक्का 
  • कारवार लोकसभा मतदारसंघात भाजपची मुसंडी

बेळगाव / प्रतिनिधी 

गत ७ मे रोजी झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये  संपूर्ण कर्नाटकचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपचे जगदीश शेट्टर तर चिक्कोडीतून काँग्रेसच्या प्रियांका जारकीहोळी यांनी विजय संपादन केला आहे. 

बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि काँग्रेसकडून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्यात मुख्य लढत झाली. यामध्ये जगदीश शेट्टर यांनी १,७३,७३० मतांच्या फरकाने विजय मिळवला. जगदीश शेट्टर यांना ७,५०,९४९ मते मिळाली तर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांना ५,७७,२१९ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी मतमोजणीवेळी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम राखली. 

या निवडणुकीत भाजपच्या तिकीट वाटपाचा गोंधळ आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या स्थानिक नेत्यांच्या नाराजीमुळे महत्त्वाची मते काँग्रेसच्या बाजूने झुकतील अशी चर्चा निकालापूर्वी सुरू होती. मात्र मोठा राजकीय अनुभव असलेल्या शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बरीच रणनीती आखून आपल्याविरोधातील नाराजी शमवली. त्यामुळेच या निवडणुकीत शेट्टर विजयी झाले आहेत. 

  • चिक्कोडी मतदार संघात परिवर्तन : विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्लेंचा पराभव  

या निवडणुकीत चिक्कोडी लोकसभा मतदार संघात मोठा बदल घडला आहे. काँग्रेसच्या नवोदित उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी भाजपचे जेष्ठ आणि अनुभवी उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्यावर मात करून अभूतपूर्व विजय मिळवला आहे. प्रियांका जारकीहोळी या ९२६५५ मतांनी विजयी झाल्या. त्यांना ७१०८२३ आणि अण्णासाहेब जोल्ले यांना ६१८१६८ मते पडली. 

  • नवोदित विरुद्ध अनुभवी अशी लढत : 

चिक्कोडी मतदारसंघात नवोदित विरुद्ध अनुभवी अशी लढत पाहायला मिळाली. जिथे भाजपचे अनुभवी नेते अण्णासाहेब जोल्ले प्रियंका जारकीहोळी यांच्याकडून पराभूत झाले आहेत. चिक्कोडीत भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले हे ६१ वर्षीय ज्येष्ठ राजकारणी आहेत. प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी या २७ वर्षीय तरुणी आहेत. प्रियंका यांची ही पहिलीच निवडणूक असून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून दिल्लीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

  • प्रभावी नेते प्रचारापासून अलिप्त राहिल्याने जोल्लेंचा पराभव : 

भाजपच्या तिकीटावर याच मतदारसंघातून एकेकाळी खासदार राहिलेले रमेश कत्ती हे प्रभावी राजकारणी आहेत. केएलईचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे यांचाही या क्षेत्रात प्रभाव आहे. मात्र, हे दोघेही जोल्ले यांच्या प्रचारासाठी आले नाहीत, त्यामुळे जोल्लेंचा पराभव झाला. तसेच भाजपचे गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी आणि अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी हे सुद्धा प्रचारापासून अलिप्त राहिल्याचा जोल्लेंना फटका बसला. परिणामी भाजपने चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाची  जागा गमावली. 

  • वडिलांनी केला कन्येचा प्रचार : 

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा होता. या मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्वत्र प्रचार करून काँग्रेस पक्ष मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच स्वतःच्या कन्येला निवडून आणण्यासाठी गुप्तपणे रणनिती आखली होती. याचाच परिणाम म्हणून प्रियंका जारकीहोळी यांना अण्णासाहेब जोल्ले यांच्या विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवता आला. चिक्कोडी मतदारसंघाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी पहिल्यांदाच आपले नशीब आजमावले आणि विजयश्री खेचून आणली. बेळगाव जिल्ह्याला पहिल्यांदाच कमी वयातील तरुणी खासदार म्हणून लाभल्याने महिला वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

एकंदरीत, चिक्कोडी लोकसभेच्या आखाड्यात नवोदित असलेल्या काँग्रेसच्या प्रियंका जारकीहोळी यांनी भाजपच्या जेष्ठ उमेदवारा विरुद्ध विजय मिळवून "हम भी किसीसे कम नही" हे दाखवून दिले आहे. 

  • कारवार लोकसभा मतदारसंघात भाजपची मुसंडी : 

कारवार लोकसभा मतदारसंघातून भाजपने जोरदार मुसंडी मारली असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे - कागेरी हे २९४५५३ मतांनी विजयी झाले आणि भाजपचा बालेकिल्ला अबाधित राखला. यामध्ये विश्वेश्वर हेगडे - कागेरी यांना ६६०९७९ मते तर काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना ३६६४२६ मते मिळाली.