- खासदार जगदीश शेट्टर यांच्या सूचना
- केंद्र शासनाच्या प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रगती आढावा बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वेमार्ग ही या भागातील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी आणि तो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या कामाशी संबंधित प्रलंबित भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून कामाला गती द्यावी, अशा सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी दिल्या. बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित केंद्र शासनाच्या प्रकल्पांच्या प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
९०० कोटी रुपये खर्चून बेळगाव - कित्तूर - धारवाड रेल्वे मार्गाची उभारणी हे अनेक दिवसांपासून स्वप्न होते. त्यामुळे ते प्राधान्याने पूर्ण करावे. या कामासाठी आवश्यक असलेल्या एकूण ६०० एकरांपैकी धारवाड ते बागेवाडीपर्यंतच्या ३२२ एकर जागेची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बेळगावजवळील करविनकोप्पासह काही गावांतील १५५ एकर भूसंपादनाचे काम प्रलंबित असल्याचे केआयडीबीने म्हटले आहे अशी माहिती व्यवस्थापकाने दिली. त्याला उत्तर देताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, ७३ कि.मी. लांबीच्या धारवाड-बेळगावी रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याने मार्ग बदलाची चर्चा न करता आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही करण्यात यावी. शेतकऱ्यांची बैठक बोलावून तातडीने तोडगा काढावा, असेही ते म्हणाले; त्यामुळे आवश्यक भूसंपादनाबाबत कार्यवाही करावी, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले.
भूसंपादनासाठी पोलिस बंदोबस्तासह सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. महामार्ग प्रकल्पांशी संबंधित भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यात यावी, भूसंपादन प्रक्रियेदरम्यान वेळेत नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या विविध पॅकेजमध्ये ५०० एकर जमीन संपादित केली जाणार होती. त्यापैकी ४० एकर जमीन यापूर्वीच संपादित करण्यात आली आहे. भूसंपादन झाल्यानंतरच निविदा प्रक्रिया सुरू करणे चांगले, असे मत मांडणाऱ्या अधिकाऱ्यांना खासदारांनी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निविदा प्रक्रिया करावी, असे सांगितले.
कायद्याच्या मर्यादेत शेतकऱ्यांशी चर्चा करून पहिल्या पॅकेजच्या संदर्भात दोन महिन्यांत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर दुसऱ्या पॅकेजची प्रक्रिया सुरू करा, अशा सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी केल्या. बेळगाव रिंगरोडसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खासदार जगदीश शेट्टर यांनी स्मार्ट सिटीशी संबंधित शहरात सुरू असलेल्या कामांचे व्यवस्थापन ही कंत्राटदाराची जबाबदारी असून निकृष्ट काम असल्यास ठेकेदाराला दंड आकारण्याची मुभा आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती, मनरेगा, एक जिल्हा एक उत्पादन योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रथम आला असून, केंद्राच्या पुरस्कृत योजनेत जिल्हा सर्वोत्तम असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विमानतळासाठी आवश्यक जमीन यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली असून कंपाऊंडचे बांधकाम व ग्रामस्थांसाठी रस्ता तयार करण्याबाबत विमानतळ प्राधिकरण स्तरावर निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रेल्वे, केएआयडीबी, विमानतळ, जलजीवन मिशन, स्मार्ट सिटी योजना यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇
0 Comments