• रायबाग येथील शेतकऱ्यांची मागणी 
  • बेळगाव उद्यान विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

बेळगाव / प्रतिनिधी 

बस्तवाड (ता.रायबाग) येथील शेतकऱ्यांनी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरितसेना यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बेळगाव उद्यान विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. बागायत विभागाने शेतकऱ्यांना मंजूर केलेल्या योजनेत अधिकाऱ्यांनी १९ लाख २८ हजार रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. तेव्हा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देत निदर्शने केली. 

फलोत्पादन विभागामार्फत २०१९ मध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्यात आल्या. या योजनेंतर्गत प्रकल्पांसाठी १९ लाख २८ हजार रूपये मंजूर झाले होते. मात्र एजंट आणि अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे पैसे न देता रायबाग तालुक्यातील बस्तवाड गावातील तीन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सीआर सेलने याआधीच अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा अहवाल दिला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत आणि कर्तव्यात कसूर करून झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या रवींद्र हकाटे, मारुती काखीमणी, अशोक कारेप्पागोळ, शिवानंद सवसुद्दी आणि कल्लाप्पा गुडीमनी या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राघवेंद्र नायक यांनी दिला.

यावेळी शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी, प्रकाश नायक, रायबाग तालुक्यातील बस्तवाड गावातील शेतकरी, कर्नाटक राज्य शेतकरी संघटना, हरित सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.