• म. ए. समितीतर्फे कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

१९८६ साली कन्नड सक्ती आंदोलनात अनेक सीमावासियांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळेच ६७ वर्षांनंतरही सीमाप्रश्नाची धग कायम आहे. या हुतात्म्यांना सदैव स्मरणात ठेवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून पुन्हा सीमालढ्याला बळकटी देण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करताना केला. 

हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहण्यात आल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, खजिनदार प्रकाश मरगाळे, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, आर. एम. चौगुले, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, ॲड. अमर येळ्ळूरकर, निरंजन सरदेसाई, मारुती परमेकर, मदन बामणे, लक्ष्मण होनगेकर, मनोज पावशे, मनोहर संताजी, खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, रामचंद्र मोदगेकर, मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील, आर. आय. पाटील, मदन बामणे, चंद्रकांत कोंडुस्कर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, शुभम शेळके, अंकुश केसरकर, नितीन देसाई, ॲड. सुधीर चव्हाण, पांडुरंग पट्टण, शिवाजी राक्षे, सुनील अष्टेकर, यल्लाप्पा पाटील, प्रकाश अष्टेकर, दुधाप्पा बागेवाडी, सतीश पाटील, महेश जुवेकर, अनिल पाटील, अमित देसाई, धनंजय पाटील, उमेश पाटील, शेखर पाटील, श्रीकांत कदम, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, शिवानी पाटील, साधना पाटील, रूपा नावगेकर आदींनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार व फुले वाहून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन बाळगून कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर बोलताना म्हणाले, सीमाभागात गेल्या ६७ वर्षांपासून सीमावासीयांवर अन्याय होतोच आहे. अलीकडे अन्यायाची तीव्रता वाढलेली आहे. परंतु महाराष्ट्रातील एकही नेता याविषयी बोलत नाही, हे आपले दुर्दैव आहे. यासाठीच आपल्यामध्ये एकी अभेद्य असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना आपल्या पक्षव्यतिरिक्त आमच्या व्यथा दिसत नाहीत. आपल्याविषयी त्यांना सहानुभूती नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

माजी आमदार मनोहर किणेकर बोलताना म्हणाले, १९५६ साली निर्माण झालेल्या सीमाप्रश्नाला आजवर न्याय मिळाला नाही. भाषावार प्रांतरचनेत अन्यायाने डाम्बण्यात आलेल्या सीमाभागाचा, सीमाप्रश्नी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांचा महाराष्ट्राला विसर पडला आहे. महाराष्ट्राच्या निराशाजनक वर्तणुकीमुळे सीमाभागातील संघटन निष्किय होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या घटक समितीच्या माध्यमातून व्यापक बैठका घेण्यात याव्यात आणि नव्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाच्या संधी देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली.

याप्रसंगी खानापूरचे निरंजन सरदेसाई, राजाभाऊ पाटील, ॲड. अमर येळ्ळूरकर, रमाकांत कोंडुसकर, महादेव पाटील, ॲड. राजाभाऊ पाटील, आर. एम. चौगुले, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. 

यावेळी माजी नगरसेविका सुधा भातकांडे, मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश  मरगाळे, मदन बामणे, नेताजी मनगुतकर, आर. आय. पाटील, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, गोपाळ देसाई, अंकुश केसरकर आदींसह मोठ्या संख्येने समिती नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.