- पूर्वीप्रमाणे जत्रा व्हावी भाविकांची मागणी
उचगाव / वार्ताहर
बेळगाव तालुक्याच्या उचगाव मळेकरणी देवीच्या जत्रेत पशुबळी देण्यास बंदी घालण्यात आली असून, पशुबळी देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र किमान नवस पूर्ण करण्याच्या निमित्ताने पूर्वीप्रमाणेच पण सध्या पद्धतीने जत्रा करण्याची परवानगी द्यावी अशी भाविकांची मागणी आहे.
बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील मळेकरणी देवी मंदिरात दर मंगळवार व शुक्रवारी बेळगाव शहर आणि तालुका तसेच नजीकच्या चंदगड तालुक्यातून जत्रेच्या निमित्ताने भाविक पशुबळी देण्यासाठी येतात. त्यामुळे गावात स्वच्छतेची समस्या निर्माण होते. या कारणास्तव उचगाव ग्रामपंचायतीच्या व्यवस्थापन मंडळाने पशुबळी न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अधिकारी बसवनाप्पा कलशेट्टी, सिद्धराया भोसगी, तहसीलदार गंगाराम काकती यांनी मळेकरणी देवी मंदिराला भेट देऊन भाविकांना पशुबळी न देण्याबाबत महत्त्व पटवून दिले.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे म्हणाल्या, 'मंदिराच्या आजूबाजूला यापुढे पशुबळी देता येणार नाही. कारण जत्रेच्या निमित्ताने येथे येणारे भाविक बकऱ्या - मेंढ्यांचा बळी देतात आणि त्यामधील अनावश्यक घटक मंदिर परिसर, रस्त्यानजीक गटारी तसेच लगतच्या शेतवडीत फेकून देतात. परिणामी गावातील शाळा, आरोग्य केंद्र आणि मंदिर परिसरातील रहिवाशांमध्ये रोगराई पसरण्याचा धोका आहे. याशिवाय जत्रेमुळे उचगावमध्ये संपूर्ण वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तर मंदिर पंच समिती सदस्य प्रवीण देसाई म्हणाले, ग्रामपंचायतीचा आदेश गोंधळात टाकणारा आहे. त्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या निर्णयाबाबत भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या जत्रेत स्वच्छता राखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
काही महिला भाविकांनी किमान नवस पूर्ण करण्याच्या निमित्ताने पूर्वीप्रमाणेच पण सध्या पद्धतीने जत्रा करण्याची परवानगी देण्याची मागणी केली.
यावेळी बेळगाव येथील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायत विकास अधिकारी उचगाव यांनी उपस्थित राहून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सूचना केल्या. तसेच आतापासून तुम्ही उचगाव येथील मळेकरणी देवी मंदिरात येऊन भक्तीभावाने दर्शन घेऊन पूजाविधी करू शकता, पण पशुबळीला परवानगी नाही. प्राण्यांचा बळी घेणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
0 Comments