- सौंदत्ती तालुक्याच्या हुलीकट्टी गावातील घटना
सौंदत्ती / वार्ताहर
यात्रेनिमित्त आयोजित केलेला महाप्रसाद खाल्ल्यामुळे ४६ जणांची प्रकृती अस्वस्थ झाल्याचा प्रकार सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात घडला आहे.
मंगळवार दि. (२१) मे रोजी हुलीकट्टी (ता. सौंदत्ती; जि. बेळगाव) येथे बीरेश्वर आणि करेम्मा देवीच्या यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या महाप्रसादातील भात आणि आमरस खाल्ल्यामुळे काही जणांना जुलाबाचा त्रास सुरु झाला. अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्याने रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये पाच जण गंभीर आजारी आहेत. त्यांना धारवाड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकारानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी हुलीकट्टी गावात जातीनिशी हजर आहेत. तसेच गावकऱ्यांच्या आरोग्यावर त्यांचे बारकाईने लक्ष आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून तालुक्याच्या डॉक्टरांकडून शिबिर सुरू केल्यानंतर सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रसादाचे सेवन करणाऱ्यांमध्ये उलट्या व जुलाबाचा त्रास दिसून आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. दर तासाला रुग्णांवर लक्ष ठेवले जात आहे. कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
घटनेची माहिती समजताच आमदार विश्वास वैद्य यांनी सौंदत्ती येथील सरकारी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. २४ तास वैद्यकीय उपचार पुरविण्यात यावेत, तसेच रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, यासह सर्व रुग्णांना दर्जेदार उपचार देण्याच्या सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या.
0 Comments