बेळगाव / प्रतिनिधी 

हे दृश्य  ऐतिहासिक प्राचीन काळातील नाही. तर बेळगाव शहराच्या अनगोळ येथील काळा तलावाचे आहे. दुष्काळामुळे पाण्याअभावी शेतकरी चिंतेत आहेत. त्यांना पिकांना आणि पशुधनाला पाणी देणे कठीण होत आहे. तलावामध्ये वाढलेली महाकाय जलपर्णी इतकी दाट आहे की त्याने तलाव पूर्णपणे व्यापला आहे. त्यातच  दूषित पाणी मिसळत असल्याने ते वापरण्यास योग्य नाही. 

भविष्यात पाणी पिके आणि पशुधनासाठीच वापरले जाते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जे  शेतकरी आपल्या गुरांना दिवसातून २ ते ३ वेळा पाणी घालत होते त्यांना आता दिवसातून फक्त १ किंवा २ वेळा पाणी घालण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

हा तलाव गाळाने भरलेला आहे. काही वर्षांपूर्वी त्यातील गाळ काढण्यात आला. मात्र व्यवस्थापनाअभावी गाळ काढण्याचे काम  रखडले आहे . उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांची सोय व्हावी यासाठी पावसाळ्यापूर्वी हा तलावाची स्वछता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.