- गावातील यात्रेची सर्व तयारी पूर्ण : ग्रामस्थांचा उत्साह शिगेला
सांबरा / वार्ताहर
तब्बल अठरा वर्षानंतर होणारी सांबरा (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा उद्या दि. १४ मे पासून सुरू होत आहे. यानिमित्ताने गावातील यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यात्रा कालावधीत बेळगाव-सांबरा मार्गावरील वाहतूक लक्षात घेऊन यात्रा समितीने तीन पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी भाविकांना यात्रा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटीला सहकार्य करण्याची विनंती केली. तब्बल अठरा वर्षांनंतर सांबरा गावात श्री महालक्ष्मी यात्रा होणार असल्याने या यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. श्री महालक्ष्मी देवीचा विवाह मंगळवार दि. १४ मे रोजी सकाळी होणार आहे. त्यानंतर रथोत्सवाला सुरुवात होणार आहे. पुढे ४ दिवस हा रथोत्सव चालणार आहे. त्यानंतर शुक्रवार दि. १७ मे रोजी सायंकाळी देवी गदगेवर विराजमान होणार आहे. त्यानंतर बुधवार दि. २२ मे रोजी ओटी भरण्याचा कार्यक्रम व यात्रेची सांगता होणार असल्याचे यात्रा समितीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी सांगितले.
यात्रा समितीचे खजिनदार यांनी पार्किंग व्यवस्थेबाबत माहिती दिली. तसेच पहाटे पाच ते आठ या वेळेत भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान आवश्यक सेवा पुरविल्या जातील असे ते म्हणाले.
श्री महालक्ष्मी देवी विराजमान होणार त्या गदगेच्या ठिकाणी अक्षरधाम मंदिराच्या प्रतिकृतीतील भव्य शामियान्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.एकंदरीत यात्रा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने सांबरा ग्रामस्थांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.
0 Comments