विजयपूर / वार्ताहर 

बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह सापडल्याने आज विजयपूर शहरात एकच खळबळ उडाली. विजयपूर गच्छीनागट्टी कॉलनीत खेळताना ही तीन मुले काल रविवार दि. १२ मे रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर आज विजयपूर शहरातील शांतीनिकेतन शाळेजवळ महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील वॉटर प्युरिफायरमध्ये त्यांचे मृतदेह आढळून आले. अनुष्का (१०), विजय (८) आणि मिहार (७) अशी मृतांची नावे आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, शाळेला सुट्टी असल्याने अनुष्का आणि विजय गदग येथून विजयपूर येथे नातेवाईकांच्या घरी आले होते. येथील स्थानिक असलेल्या मिहारबरोबर खेळताना मुलांची हालचाल सीसी कॅमेऱ्यात कैद झाली.बेपत्ता झालेल्या या मुलांचा पालक कालपासून शोध घेत होते. 

दरम्यान मुलांना शोधण्यात अपयश आल्याने पालकांनी विजयपूर एपीएमसी पोलिसात मुले बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली. या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, अखेर विजयपूर महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील वॉटर प्युरिफायरमध्ये मुलांचे मृतदेह आढळले. पोलिसांनी जलशुद्धीकरण केंद्रातून तीनही मृतदेह बाहेर काढले आणि उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

या घटनेची नोंद विजयपूर एपीएमसी पोलिसात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत, जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य गेटवर सुरक्षारक्षक नसल्याने ही दुर्घटना घडल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.