विजयपूर / वार्ताहर 

खेळताना वॉटर प्युरिफायरमध्ये पडून तीन मुलांचा मृत्यू झाला. विजयपूर शहरातील शांतीनिकेतन शाळेजवळ महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात सोमवार (दि. १३) मे रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

कामातील बेजबाबदारपणामुळे मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल, आयपीसी कलम ३०४अ अंतर्गत महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदर्शनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे आमच्या मुलांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे. काल सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील वॉटर प्युरिफायरमध्ये पडून तीन मुलांचा मृत्यू झाला होता. 

मलनिस्सारण ​​प्रक्रिया प्रकल्प महापालिकेच्या अखत्यारीत येतो. सदर युनिटला संरक्षक भिंत आणि गार्ड नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आणि मुलांना जीव गमवावा लागला, असा संताप व्यक्त करण्यात येत होता.