सांबरा / वार्ताहर 

बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सांबरा या गावच्या श्री महालक्ष्मी यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून सूर्योदयानंतर अक्षतारोपण पार पडले. ही यात्रा १४ ते २२ मे या दरम्यान साजरी करण्यात येणार आहे.

तब्बल १८ वर्षांनंतर भरणाऱ्या सांबरा या गावच्या श्री महालक्ष्मी यात्रोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली असून सूर्योदयानंतर यात्रा कमिटी, हक्कदार, देवस्की पंच आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत अक्षतारोपण पार पडल्यानंतर मानाची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला.

यानंतर देवीचा व्हन्नाट सुरु करण्यात आला. आजपासून सलग चार दिवस देवीचा भव्य रथोत्सव पार पडणार असून चावडी गल्लीमार्गे संपूर्ण गावात रथोत्सव पार पडणार आहे. शुक्रवारी देवी गदगेवर विराजमान होईल. यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी दिली. शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस यात्रेचे मुख्य दिवस असून यादरम्यान पै - पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. 

आज झालेल्या अक्षतारोपण विधिदरम्यान यात्रा कमिटी, हक्कदार, देवस्की पंच कमिटी आदींसह ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ अबालवृद्धांसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.