खानापूर / प्रतिनिधी
घरात कोणीही नसल्याचे पाहून, एका महिलेने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. खानापूर तालुक्यातील चापगांव येथे ,शुक्रवार दि. १७ मे रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली. मंगल सोमलिंग धबाले (वय ५७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून चापगांव येथील सामाजिक कार्यकर्ते सोमलिंग धबाले यांची ती पत्नी होय.
आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. दरम्यान या प्रकरणाची नंदगड पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी जागेचा पंचनामा करून, मृतदेह खानापूर येथील शासकीय दवाखान्यात आणला आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याबाबत नंदगड पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास व हवालदार बसू कर्वीनकोप्प अधिक तपास करीत आहेत.
- माजी आमदार अरविंद पाटील यांच्याकडून मृताच्या नातेवाईकांचे सांत्वन :
घटनेची माहिती मिळताच, खानापूर तालुक्याचे माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील, यांनी खानापूर येथील सरकारी रुग्णालयात भेट देऊन, मृताच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले व पोलिस आणि सरकारी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना, लवकरात लवकर शल्यचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास सांगितले आहे.
0 Comments