• मंदिर संवर्धन, सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

पंढरपूर, दि. १७ / प्रतिनिधी 

विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची विठ्ठल भक्तांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम वेगाने सुरू असून अंतिम टप्प्यात आले आहे. महिनाअखेर काम पूर्ण होईल. जूनपासून विठुरायाचे पदस्पर्श सुरू होईल, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.पुरातन असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मुळरूप देण्यासाठी राज्य शासनाने जवळपास ७४ कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा मंजूर केला आहे.

पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली १५ मार्चपासून विठ्ठल मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मंदिराचे काम सुरू असल्याने भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. पहाटे सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू आहे. मंदिर संवर्धनाचे काम वेगाने सुरू आहे आणि कामाचा दर्जा देखील चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिर समितीने संबंधित ठेकेदाराला काम करण्यासाठी दिलेली मुदत संपली असली तरी मंदिरातील सर्व कामे अत्यंत काळजीपूर्वक आणि तितक्याच जबाबदारीने करण्यात येत आहेत. काही दिवसांचा अधिक अवधी लागला असला तरी सध्या मंदिरातील कामे अंतिम टप्प्यात आहेत.