हुबळी / वार्ताहर 

हुबळी येथील विद्यार्थिनी नेहा हिरेमठच्या हत्येचा तपास करणारे सीआयडी पथक लवकरच आरोपपत्र सादर तयारीत आहे. दि. १८ एप्रिल रोजी बीव्हीबी कॉलेजच्या आवारात नेहाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी फय्याज याला पोलिसांनी अटक केली आहे. 

या घटनेनंतर आरोपीला कठोर शिक्षा देणे पुरेसे नाही. तेव्हा त्याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी लढा दिला होता. त्यानंतर सतर्क झालेल्या राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्यासाठी सीआयडी पथकाची नेमणूक केली. 

सीआयडीच्या पथकाने आरोपीला सहा दिवस ताब्यात घेतले, खून कोणत्या ठिकाणी झाला, चाकू विकत घेतलेले ठिकाण, कॉलेजच्या आवारामध्ये दुचाकी उभी केलेल्या ठिकाणासह अनेक ठिकाणी पोलिसांनी त्याला नेले. एसआयटीने नेहाच्या पालकांचीही चौकशी केली. अशाप्रकारे, सर्वआयामांसह तपास केलेल्या सीआयडी पथकाने या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी केली आहे. आरोपी फय्याज सध्या न्यायालयीन कोठडीत असून न्यायालयीन कोठडीची मुदत १४ मे रोजी संपणार आहे.