• मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला विश्वास 
  • विजयनगर येथील प्राथमिक शाळेच्या बूथ क्रमांक ६१ वर  बजावला मतदानाचा हक्क 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर आणि प्रियंका जारकीहोळी विजयी होतील, असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळर यांनी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव विजयनगर येथील शासकीय मराठी प्राथमिक शाळेच्या बूथ क्रमांक ६१ वर कुटुंबासह येऊन मतदान केले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र व काँग्रेसचे  उमेदवार मृणाल हेब्बाळकर, सून डॉ. हिता, आई गिरिजा हट्टीहोळी व भाऊ तथा विधान परिषदेचे सदस्य डॉ. चन्नराज हट्टीहोळी यांनी त्यांच्या पत्नीसह मतदान केले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी  बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, भारतातील लोकशाहीचा सर्वात मोठा सण म्हणजे मतदानाचा दिवस. प्रत्येकाने न चुकता मतदान करावे. चांगला लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे, बेळगाव मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या बाजूने चांगलीच लाट आहे. मतदारसंघात विजयाची नोंद करून काँग्रेस नवा इतिहास रचणार आहे. माझा भाऊ, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. अरभावी, गोकाक, बेळगाव उत्तर मतदारसंघातही काँग्रेसची प्रगती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

मी माझ्या कुटुंबासह आलो आणि मतदान केले. सर्वांनी येऊन मतदान करावे. यावेळी बेळगाव मतदारसंघात काँग्रेस पक्ष शंभर टक्के विजयाची नोंद करेल, असे काँग्रेसचे  उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा विजय निश्चित आहे. आम्ही एकत्र काम केले आहे. चिक्कोडी व बेळगाव मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विजयी होणार असून बेळगावचा स्वाभिमान विजयी होईल, असा विश्वास विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केला.