• लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेळगावात घेतली भेट 

बेळगाव / प्रतिनिधी 

हुबळीच्या तीन हजार मठाचे जगद्गुरू श्री गुरुसिद्ध राजयोगिंद्र स्वामीजी यांनी आज शनिवार (दि. ४) मे रोजी बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांची खासदार मंगला अंगडी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी जगदीश शेट्टर यांनी शाल, पुष्पहार आणि फळांची परडी प्रदान करून स्वामीजींचा सन्मान केला. तर स्वामीजींनीही जगदीश शेट्टर यांना शाल व पुष्पहार प्रदान करून आगामी निवडणुकीसाठी आशीर्वाद दिला. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्री गुरुसिद्ध राजयोगिंद्र स्वामीजी म्हणाले, जगदीश शेट्टर यांच्या कुटुंबाचे हुबळीतील तीन हजार मठाशी अतूट नाते जोडलेले आहे. मी वैयक्तिक कामानिमित्त बेळगावला आलो असताना निवडणुकीच्या अनुषंगाने जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

जगदीश शेट्टर या निवडणुकीत चांगली कामगिरी करतील. आम्ही स्वामीजी आमच्या भक्तांना कोणताही संदेश देण्यासाठी आलो नाही. एकंदरीत जगदीश शेट्टर हे त्यांच्यासाठी चांगले असतील, असे ते म्हणाले.

यावेळी बैलहोंगलच्या तीन हजार शाखा मठाचे स्वामीजी, कोर्टी कोलारच्या गनिग समाजाचे स्वामीजी, अरळीकट्टी वीरक्त मठाचे स्वामीजी, घटप्रभा होसमठाचे श्री स्वामीजी, बिदर वीरक्त मठाचे स्वामीजी, तारिहाळ आदिवेश मठाचे स्वामीजी उपस्थित होते.