• कित्तूर - बैलहोंगल पोलिसांची संयुक्त कारवाई

बैलहोंगल / वार्ताहर 

बैलहोंगल येथील होलिहोसूर येथे कित्तूर आणि बैलहोंगल पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ८९० लिटर दारूचा अवैधसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी  दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुद्रप्पा थोरगल (रा.होलिहोसूर) व नागप्पा गंगाप्पा गोरकोल्ल (मूळचा चिवतगुंडी सध्या रा. एम.के. हुबळी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. 

होलिहोसूर येथे अवैधरित्या दारू साठवली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे, कित्तूर आणि बैलहोंगल पोलिसांनी होलिहोसूर येथील रुद्रप्पा थोरगल यांच्या घरावर छापा टाकून ही कारवाई केली. 

या कारवाईत ९० मिलीची ९६०० पाकिटे, ३,८३,७१२ रुपये किंमतीची ओरिजिनल चॉईस व्हिस्की आणि १७, ६६० रुपये किंमतीची २८८ मॅकिंटॉश चॉईस व्हिस्की असा एकूण ८९० लिटर अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.