- शोकाकुल वातावरणात सुळगा (हिं.) येथे अंत्यसंस्कार
सुळगा (हिं.) / वार्ताहर
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या शेतकरी नेत्या जयश्री गुरन्नावर यांच्या पार्थिवावर गुरूवार (दि. २३) मे रोजी बेळगाव तालुक्याच्या सुळगा (हिं.) गावातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बुधवार (दि. २२) मे रोजी अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले होते. दरम्यान जयश्री गुरन्नावर यांना अंतिम निरोप देण्यासाठी आज किल्ला तलावाजवळील सम्राट अशोक चौक येथून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा राणी कित्तूर चन्नम्मा चौकात आल्यानंतर तिथे काहीवेळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. याप्रसंगी विविध मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन जयश्री गुरन्नावर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. यावेळी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर शेतकऱ्यांनी हिरवा टॉवेल हवेत उंचावून जयश्री गुरन्नावर यांना मानवंदना दिली.
त्यानंतर सजवलेल्या वाहनातून मिरवणुकीने पार्थिव सुळगा (हिं.) गावी आणल्यावर गावातील स्मशानभूमीत साश्रू नयनांनी जयश्री यांना अखेरचा निरोप देण्यात आला. तत्पूर्वी अनेक शेतकरी समर्थक कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतल्यावर निवासस्थानापासून काढलेल्या अंत्ययात्रेला ग्रामस्थांची गर्दी होती. अंत्ययात्रेत महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी हलगा - मच्छे बायपाससंदर्भात ठाम भूमिका घेणाऱ्या आणि समस्त शेतकरी बांधवांचा आधारवड ठरलेल्या जयश्री यांच्या निधनाने संपूर्ण शेतकरी समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याचे सांगून शेतकरी नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लग्नाच्या अवघ्या तीन वर्षात पती गमावलेल्या आणि एक मुलगा असलेल्या जयश्रीने गेल्या १५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या संघर्षात सहभागी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
0 Comments