•  बेळगावात कोळी बेस्टा समाजाचे आंदोलन

बेळगाव / प्रतिनिधी 

हुबळी येथील अंजली अंबिगेर हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी बेळगाव जिल्हा कोळी बेस्टा समाजाच्यावतीने आज बेळगाव शहरात आंदोलन करण्यात आले.

यावेळी चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करून अंजलीच्या हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. अंजलीच्या मारेकऱ्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत पोलिसांकडे तोंडी तक्रार करूनही निष्काळजीपणामुळे अंजलीचा खून झाला आणि कारवाई झाली नाही. नेहा हिरेमठच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई केली असती तर अशा घटना पुन्हा घडल्या नसत्या, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. नेहा आणि अंजलीच्या  मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या किंवा त्यांचा एन्काउंटर करा ते शक्य नसेल तर संबंधित आरोपींना आमच्याकडे सोपवा, आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना शिक्षा करू, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना साबण्णा तळवार यांनी अंजली अंबिगेर हिच्या हत्येचा निषेध करण्यासाठी बेळगाव शहरात कोळी बेस्टा समाजाच्यावतीने निदर्शने करण्यात येत आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधव आंदोलनात सहभागी होत आहेत. हुबळीतील ही दुसरी घटना आहे. आताही विद्यार्थिनीवर 

हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. काही कारणावरून हल्लेखोराने अंजलीचा खून केला. नेहाच्या हत्येपूर्वी आणखी एक हत्येची घटना घडली असून राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. अंजलीची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मृत अंजलीच्या कुटुंबियांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

तर माजी उपमहापौर मधुश्री पुजारी म्हणाल्या, नेहाच्या हत्येचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. त्यातच आता ही दुसरी हत्या झाली आहे. राज्यात महिलांनासंरक्षण नाही. शासनाने याकडे लक्ष द्यावे. महिलांचे संरक्षण झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

या आंदोलनाला बेस्टा समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, धारप्पा पुजारी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.