बेळगाव / प्रतिनिधी
पाँडेचरी - दादर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने टीसीसह रेल्वेतील चार जणांवर चाकू हल्ला केला. यादरम्यान एकाच मृत्यू झाला असून उर्वरित जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोंढा ते खानापूर रेल्वेस्थानका दरम्यान गुरुवारी ही घटना घडली होती.
याप्रकरणी आज बेळगाव जिल्हा रुग्णालयात पोलिस उपमहानिरीक्षक शरणप्पा यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.
यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना पोलिस उपमहानिरीक्षक शरणप्पा म्हणाले, रेल्वेत झालेल्या घटनेतील आरोपीवर आयपीसी कलम ३०२, ३०७, ३३२, ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिकीट तपासणीसाठी आलेल्या टीसींसह रेल्वे कर्मचाऱ्यांवरही अज्ञाताने हल्ला केला असून या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. देवर्षी वर्मा असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव असून मृतांच्या कुटुंबियांना रेल्वे विभागातर्फे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. अज्ञात हल्लेखोर फरार असून त्याच्या शोधार्थ आरपीएफजीआरजी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
जीआरजी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून कर्मचारी वाढीसाठी आवश्यक ते पाऊल उचलण्यात येणार आहे. आरोपी चालत्या रेल्वेतून खाली उतरल्याची माहिती उपलब्ध झाली असून यादरम्यान आरपीएफ पोलीस त्याठिकाणी हजर नव्हते. राज्यात दररोज १४०० रेल्वे धावतात. परंतु आपल्याकडे केवळ ८३० कर्मचारी कार्यरत असून एका रेल्वेसाठी एक कर्मचारी पुरेल अशीही तजवीज नसल्याचे ते म्हणाले. गुन्हेगारी आणि संवेदनशील भागात कर्मचारी नियुक्त करण्यासंदर्भात विचार सुरु असल्याचेही पोलिस उपमहानिरीक्षक शरणप्पा यांनी सांगितले.
0 Comments