- विविध कसरतींच्या प्रात्यक्षिकांसह शिवजयंती चित्ररथ मिरवणूक उत्साहात
बेळगाव / प्रतिनिधी
डौलाने फडकणारे भगवे ध्वज, झांज, ढोलताशा, करेल आणि विविध कसरतींच्या प्रात्यक्षिकांसह बेळगावमध्ये शनिवार दि. ११ मे रोजी सुरू झालेली शिवजयंती चित्ररथ मिरवणूक उत्साहात पडली.
जोरदार पावसामुळे ह्या चित्ररथ मिरवणुकीला थोडासा विलंब झाला मात्र पावसाने उघडीप देताच तितक्याच जल्लोषात आणि उत्साहात मिरवणुकीचा प्रारंभ झाला. शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांच्याहस्ते शिवप्रतिमा असलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले. टाळ मृदूंगाच्या गजरात पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. वडगाव येथील ज्ञानेश्वरी भजनी मंडळाच्या वारकऱ्यांनी यावेळी भजने सादर केली.
सालाबादप्रमाणे शिवजयंती उत्सव महामंडळाने मिरवणुकीचे नियोजन निश्चित केले होते. यावेळी डीजेला फाटा देत तालबद्ध रित्या भजन आणि ढोल ताशा वादांवर भर देण्यात आला होता. शिव चरित्रातील प्रसंग सजीव देखाव्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले . शूरवीर कोंढाजी फर्जंद, प्रतापराव गुर्जर यांचा त्याग, अफझल खानाचा वध, रोहिडेश्वराची शपथ, शाहिस्तेखानची बोटे छाटल्याचा प्रसंग, शिवरायांचा जन्मसोहळा, माता जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव आदी एकाहून एक सर्रास सजीव देखावे सादर करण्यात आले.
पोवाडे, भजने, आदींमुळे मिरवणुकीची रंगत आणखी वाढली. शिवाय करेला, दांडपट्टा, तलवारबाजी, यासह इतर मर्दानी खेळ सादर करून शिवकालीन कलांची आठवण करून करून देण्यात आली. पावसाची रिपरिप सुरु असताना देखील शिवप्रेमींच्या उत्साह दांडगा दिसून आला. ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत चालली.
0 Comments