• प्रेमास नकार दिल्याने प्रियकराचे अमानवी कृत्य 
  •  प्रियकराला अटक , हुबळी विद्यानगर पोलिसांची कारवाई 
  • बीव्हीबी कॉलेजमध्ये झालेल्या हत्येने संपूर्ण शहर हादरले 

हुबळी / वार्ताहर 

प्रेमास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केली. हुबळीच्या बीव्हीबी कॉलेजमध्ये गुरुवारी भरदिवसा झालेल्या या हत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. नेहा हिरेमठ असे हत्या झालेल्या मुलीचे नाव असून फयाज (रा. मूळचा सौंदत्ती, ता. जि. बेळगाव) असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. नेहाचे वडील  निरंजन हिरेमठ हुबळी-धारवाड महानगर महापालिकेचे नगरसेवक आहेत. 

याबाबाबत सविस्तर माहिती अशी की, खून झालेली नेहा हिरेमठ ही हुबळीच्या बीव्हीबी कॉलेजमध्ये एमसीएचे शिक्षण घेत होती. हत्येतील आरोपी फयाज हाही याच महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून नेहाने प्रेमाकडे पाठ फिरवून नकार दिला. यामुळे फयाजने रागाच्या भरात नेहाच्या मानेवर दोन्ही बाजूंनी चाकूने वार करून तिची हत्या केल्याची माहिती आहे.

सध्या नेहाचा मृतदेह हुबळीच्या किम्स रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या घटनेनंतर हिरेमठ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, हुबळी येथील विद्यानगर पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील आरोपी फयाज याला अटक केली आहे.