बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील  महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी आज शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळीच धर्मवीर संभाजी चौकात समितीचे असंख्य कार्यकर्ते आणि मराठी भाषिक दाखल झाले होते. डोक्यावर भगवे फेटे, हातात भगवे ध्वज घेऊन तालुक्यासह शहर उपनगरातील समितीनिष्ठ कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण चौक भगवेमय झाला होता. 

प्रारंभी धर्मवीर संभाजी चौकात समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला. त्यानंतर बहुसंख्य समिती कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीला सुरूवात झाली. मराठमोळ्या संस्कृतीनुसार सजविलेल्या बैलगाडीतून महादेव पाटील अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी बैलगाडीतून हात उंचावून महादेव पाटील यांनी जनतेकडे मतयाचना केली. बेळगाव शहर, उपनगरासह ग्रामीण भागातील शेकडो स्त्री-पुरुष कार्यकर्ते व मराठी भाषिकांचा सहभाग असणारी उमेदवार महादेव पाटील यांची ही मराठी अस्मिता दर्शवणारी मिरवणूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकी दरम्यान हर हर महादेव, बेळगाव -कारवार-निपाणी - बिदर - भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी संपूर्ण मार्ग दणाणून सोडला होता. 


यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म. ए. समितीचे उमेदवार महादेव पाटील म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीने ५१ वर्षांच्या संघर्षानंतर एक सर्व सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी देऊन बेळगाव सीमाभागात नवा पायंडा पडला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या साठामारीत समितीचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. 


तसेच बेळगाव सीमाभागात मराठी संस्कृती टिकवणे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे, सुपीक शेत जमीन उध्वस्त करणाऱ्या बायपास, रिंग रोडची निर्मिती थांबवणे, मराठी शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचे षडयंत्र हाणून पाडणे, बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला दिल्लीत वाचा फोडणे अशा प्रमुख उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूक लढवत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन समितीने महाराष्ट्र एकीकरण समितीने आपण तळागाळातील कार्यकर्त्यांची कदर करतो आणि करत राहू हे दाखवून दिले आहे.

इतर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी जाताना पैसे देऊन कार्यकर्ते जमवावे लागत असताना समिती उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आज इतक्या प्रचंड संख्येने समिती कार्यकर्ते आणि मराठी भाषिक स्वयंस्फूर्तीने स्वखर्चाने येथे जमले आहेत. हा समिती उमेदवार आणि इतर उमेदवारांमधील फरक आहे असे सांगून मी महादेव पाटील म्हणजे फक्त एक प्रतीक आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूक लढवत असून समितीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास उमेदवार महादेव पाटील यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी समिती नेते रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर तथा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, रेणू मुतगेकर, येळ्ळूर ग्रा. पं. माजी अध्यक्ष सतीश पाटील आदिंनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 



धर्मवीर छ. संभाजी महाराज चौकातून यंदे खूट, कॉलेज रोड, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मिरवणुकीची सांगता झाली.मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर उमेदवार महादेव पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी समिती नेते रमाकांत कोंडुसकर, धनंजय पाटील, शुभम शेळके आर. आम. चौगुले, आर. आय. पाटील, ॲड. अमर येळ्ळूरकर आदी उपस्थित होते.