• अथक शोध मोहिमेनंतर सायंकाळी मृतदेह सापडला

खानापूर / प्रतिनिधी 

नंदगड (ता. खानापूर) येथील एका युवतीने हेब्बाळ धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.  प्राची महादेव गडकरी (वय २३, रा. कुंभारओणी नंदगड, ता. खानापूर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्राची गडकरी ही बेळगाव येथील कंकणवाडी केएलई रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कोणालाही न सांगता ती घराबाहेर पडली होती. तसेच कामावरही गेली नव्हती. दरम्यान रविवारी सकाळी नंदगडनजीक हेब्बाळ धरणावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिचे आधारकार्ड आणि चप्पल त्याठिकाणी आढळून आले. यानंतर सदर व्यक्तीने तात्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच आणि नंदगड पोलिस स्थानकाचे हवालदार शिवा तुरमुरी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुकाशी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. तसेच अग्निशमन दलाला बोलावून दिवसभर शोध घेतला असता, सायंकाळी मृतदेह शोधण्यात यश आले. 

यानंतर नंदगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी खानापूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. ही आत्महत्या आहे की घातपात हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.