खानापूर / प्रतिनिधी
कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी कणकुंबी येथील माऊली देवी मंदिर येथून करण्यात आला. प्रारंभी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कणकुंबी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश कोरवी यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना परमेकर म्हणाले, कारवार लोकसभा मतदार संघात यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद दिसून येईल तसेच कणकुंबी आणि परिसरात समितीला मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युवा कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. तालुक्यात पुन्हा एकदा समितीची ताकद निर्माण करणे काळाची गरज बनली आहे. अन्यथा कर्नाटकी प्रशासन कन्नड सक्तीसह दडपशाही वाढवण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने समितीच्या पाठीशी उभे राहून लोकसभा निवडणुकीत समितीची ताकद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत प्रचार करण्यासाठी अतिशय कमी कालावधी आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांने जबाबदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी अर्ज दाखल झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते स्वतःहून प्रचारासाठी येत आहेत. कमी कालावधी असला तरी जास्तीत जास्त गावात जाऊन प्रचार केला जाणार आहे. कारवार,जोयडा,हलियाळ व रामनगर भागात देखील अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी सर्वच भागात समितीला पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी सरचिटणीस आबासाहेब दळवी, उमेदवार निरंजन सरदेसाई, खानापूर विभाग समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले, मारुती गुरव, बाळासाहेब शेलार आदींनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर कणकुंबी गावात फेरी काढून अनेक नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या.तसेच फेरीवेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिलॆल्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी मुकुंद पाटील, सुधीर नावलकर, राजाराम देसाई, नागेश भोसले, सुरज पाटील, विशाल पाटील, राजाराम गावडे, कृष्णा गावडे, विठ्ठल गावडे, संजीव पाटील, कृष्णा धुळ्याचे, नामदेव पाटील, कृष्णा पाटील, बाळू बिरजे, संतान बरगास, संदेश कोडचवाडकर आदी उपस्थित होते.
0 Comments