• दोन वर्षांच्या सात्त्विकची मृत्यूशी झुंज यशस्वी 
  • SDRF, NDRF, अग्निशमन दल व पोलिस विभागाच्या प्रयत्नांना यश
  • तब्बल २१ तास अखंडपणे राबवली मोहीम 
  • "देव तयारी त्याला कोण मारी" या म्हणीचे प्रत्यंतर

विजयपूर / वार्ताहर 

विजयपूर जिल्ह्याच्या इंडी तालुक्यातील लचयन गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या सात्विक या २ वर्षीय बालकाला जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला अखेर यश आले आणि आपला मुलगा सुखरूप असेल की नाही या चिंतेत असलेल्या मुलाच्या पालकांनी आणि गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

SDRF, NDRF, अग्निशमन दल, पोलिस विभागाकडून सलग २१ तास अखंडपणे बचावकार्य सुरु होते. खाली डोके असलेल्या स्थितीत पडलेल्या सात्विकला वाचवण्यासाठी सर्वच पथके शर्थीचे प्रयत्न करीत होते. त्याला बोअरवेलच्या पाईपमधुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. शिवाय एंडोस्कोप कॅमेऱ्याद्वारे त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात आली होती . तब्बल २१ तासांच्या प्रयत्नानंतर सात्विकच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला .त्यामुळे बचाव पथकाचा उत्साह आणखी वाढला आणि त्यांनी आपल्या कामाचा वेग वाढवला. अखेर सात्विकला त्या बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यावेळी त्या ठिकाणी तैनात असलेल्या डॉक्टरांच्या पथकाने मुलाला उचलून घटनास्थळी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून तालुका रुग्णालयात नेले.

बुधवारी संध्याकाळी ६ वाजता बालक बोअरवेलमध्ये पडल्याचे समजताच बचावकार्य सुरू करण्यात आले. बचाव कार्यात अडथळा ठरणारे खडक फोडून, बचाव पथक आज सकाळी त्या मुलापर्यंत पोचले. शेवटी बोअरहोल पाईप कापून मुलाला उचलण्यात आले, आणि सलग २१ तास सात्त्विकची मृत्यूशी चाललेली झुंज अखेर यशस्वी ठरली. 

एकंदरीत या घटनेनंतर  या "देव तयारी त्याला कोण मारी" या म्हणीचे प्रत्यंतर घडले.