सुळगा (हिं.) / वार्ताहर 

बेनकनहळ्ळी, गणेशपूर (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी यात्रेला आजपासून सुरुवात झाली. या यात्रेसाठी आज पहिल्याच दिवशी सकाळपासून पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी बेनकनहळ्ळी येथे हजेरी लावली होती.

मंगळवारी पहाटे अक्षतारोपण विवाहविधी आणि सामूहिक आरती करण्यात आली. यावेळी  मंदिर परिसरातील रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. यानंतर भव्य रथोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी भंडाऱ्याच्या उधळणीत "उदे गं आई उदे" च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. तब्बल ३३ वर्षानंतर भरविण्यात आलेली ही यात्रा पुढील ९ दिवस सुरु राहणार असून यात्रेच्या पहिल्याच दिवसापासून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. 

बुधवारपासून देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरु होणार आहे. यात्राकाळात येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, रस्ते यासह इतर मूलभूत सुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी दिली.


समाजसेवक मोहनेश्वर गरग यांनी यात्रेबद्दल माहिती देताना, यात्राकाळात पुरविण्यात येत असलेल्या सुविधांबद्दल माहिती दिली. तसेच यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे स्वागत करत यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य मोहन सांबरेकर यांनी या भागात झालेल्या विकासकामांची माहिती दिली. 

यात्रेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी उत्तमरीत्या करण्यात आली असून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. समस्त भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, वाहनांकरिता पार्किंग वगैरे आवश्यक सर्व सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. सरस्वतीनगर, ज्योतीनगर, रामतीर्थनगर, महालक्ष्मीनगर, गंगानगर, आश्रयनगर वगैरे सर्व ठिकाणच्या नागरिकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेऊन यात्रा यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन यात्रा कमिटीच्या प्रमुखांनी केले.

एकंदरीत सध्या यात्रेनिमित्त संपूर्ण बेनकनहळ्ळी गाव सजवण्यात आले असून सर्वत्र भक्तिमय वातावरण पसरलेले पहावयास मिळत आहे.

या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇