बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव तालुक्यासह शहर परिसरात आज गुरुवारी हनुमान जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. हनुमान जयंती निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्याच्या पश्चिम भागातील  सुळगा (हिं.), विजयनगर, बेकिनकेरे यासह तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात सकाळी ६ वा. हनुमान जन्मोत्सव यानंतर दिवसभर, भजन कीर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रम सुरू होते. भक्तांसाठी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भक्तांनी याचा लाभ घेतला.

  • बेळगाव शहरात हनुमान जयंती उत्साहात :

बेळगाव तालुक्याप्रमाणे शहरातील मारुती मंदिरांमध्येही दिवसभर भक्तांची दर्शनासाठी वर्दळ दिसून आली. अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळ मारुती हनुमान मंदीरात हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री बारा ते पहाटे चार या वेळेत अभिषेक सेवा करण्यात आली.त्या नंतर सुंदरकांड आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले.सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर महापूजा आणि महाआरती करण्यात आली. सकाळपासून भक्तांनी दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. भक्तांना संपूर्ण दिवसभर तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. दुपारी महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला. पुजारी बंधूंनी अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

शहरातील मारुती गल्लीतील मारुती मंदिरात बुधवारी मध्यरात्री १ नंतर अभिषेक करण्यात आला. सुहासिनींनी पाळणा म्हटल्यानंतर हनुमान जन्मोत्सव झाला. यानंतर आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. 

हनुमान जयंती निमित्त विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.