बेळगाव : हिंडलगा येथे काल शनिवार दि. १३ एप्रिल रोजी झालेल्या भाजपच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार संजय पाटील यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि समर्थकांनी  माजी आमदार संजय पाटील यांच्या, आदर्शनगर १ ला क्रॉस बेळगाव येथील निवासस्थानी मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान माझ्यासह कुटुंबियांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, अशाप्रकारची तक्रार माजी आमदार संजय पाटील यांनी शहापूर पोलीस स्थानकात रविवार दि. १४ एप्रिल रोजी दाखल केली आहे.

या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, बेळगाव ग्रामीणमध्ये झालेल्या भाजपच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेल्या टीकेनंतर मंत्री हेब्बाळकर  यांच्या सांगण्यावरून १. आयेशा सनदी २.सुजय जाधव ३.जयश्री सूर्यवंशी ४.प्रभावती मास्तमर्डी ५. मुस्ताक मुल्ला ६. सद्दाम वैभवनगर ७. रोहिणी बाबटे  ८.शंकरगौडा गंगाप्पा पाटील ९.संगनगौडा पाटील १०.भारती बुडवी यांच्यासह सुमारे १०० जणांनी शनिवार दि. १३ एप्रिल रोजी रात्री ९.३० वा. सुमारास माझ्या घरावर दगडफेक, काचेच्या वस्तू आणि धारदार शस्त्रांचा मारा केला. याशिवाय घराच्या आवारातील किमती वस्तूंची मोडतोड केली. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यावेळी संजय पाटील यांनी असे सांगितले की, माझी हृदयशस्त्रक्रिया झालेली आहे, माझी आई देखील ९२ वर्षांची असून आजारी आहे. तेव्हा हा प्रकार थांबवण्याची विनंती त्यांनी केली. मात्र सदर आंदोलनकर्त्यांनी नजुमानता तुमचे काही बरे वाईट झाले तरी चालेल पण आम्ही तुम्हाला संपवल्याशिवाय येथून जाणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी आमचा सुरक्षा रक्षक प्रदीप डिग्गे बचावासाठी धावला असता, प्रथम तुला जिवे मारून नंतर तुझे मालक व घरातील इतरांना संपवणार अशी धमकी देऊन त्याला मारहाण केली. 


यादरम्यान आंदोलनकर्त्या महिला आम्ही हे सर्व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सांगण्यावरून करत आहोत. तुम्ही जरी आमच्यावर तक्रार दाखल केली, तरी आमच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत. कारण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर तसे होऊ देणार नाहीत असे वारंवार सांगत होत्या. 

यावेळी आजूबाजूचे लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. अन्यथा या आंदोलनकर्त्यांनी माझा आणि माझ्या कुटुंबियांचा जीव घेतला असता, असे संजय पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

एकंदरीत माझी राजकीय कारकीर्द आणि प्रतिष्ठा खराब करून बदनामी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तरी अधिकारांचा गैरवापर करून सदर प्रकार करण्यास भाग पाडलेल्या मंत्री हेब्बाळकर यांच्यासह वर नमूद केलेल्या १० व्यक्ती व सुमारे १०० जण यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहापूर पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीत माजी आमदार संजय पाटील यांनी केली आहे.