बेंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राज्यातील शाळांमध्ये सुरू झालेल्या इयत्ता पाचवी ते अकरावी पर्यंतच्या बोर्डाच्या परीक्षांना स्थगिती दिली आहे. परिणामी शिक्षण विभागाने सदर परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

इयत्ता ५ वी ते ११ वी पर्यंत बोर्डाच्या परीक्षा घेण्यास परवानगी देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या खासगी शैक्षणिक संस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेत परीक्षा घेण्यास स्थगिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाच्या  पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने पाचवी ते अकरावी पर्यंतच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त बी. बी. कावेरी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

राज्यभरातील ४५,००० शाळांमधील २८ लाख विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देत असून त्यांचे भविष्य आता अनिश्चित आहे. २८ फेब्रुवारी रोजी ११ वीच्या परीक्षा संपल्या आहेत. तर इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंतच्या परीक्षा ११ मार्चपासून सुरू झाल्या आहेत.