बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या भूमीत व्यवसाय करत असून "जय महाराष्ट्र" घोषणा देण्यास मज्जाव करणाऱ्या उद्योजकाच्या शिनोळी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील अस्थापनावर आणि फलकावर काळे फासत "जय महाराष्ट्र" असे लिहून बेळगाव येथील युवा समितीने त्यांचा निषेध केला होता. यावेळी युवा समिती नेते शुभम शेळके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून "त्या" उद्योजकाला यापुढे मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अवमान सहन केला जाणार नाही. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर "जय महाराष्ट्र" म्हणावेच लागेल असा इशारा दिला होता.
या घटनेनंतर मराठीची कावीळ झालेल्या काही कन्नड संघटनांनी शुभम शेळके यांच्या अटकेची मागणी केली होती. तसेच त्या उद्योजकावरही पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी दबाव आणला होता. त्यामुळे प्रसारमाध्यमातून भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून युवा समिती नेते शुभम शेळके यांना आज मंगळवार दि. १२ मार्च रोजी अटक करण्यात आली.
या प्रकारानंतर सीमाभागातील विशेषतः मातृभाषेसाठी लढा देणाऱ्या बेळगावातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरु असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्र हद्दीत आंदोलन केले तरी समिती नेत्यांवर बेळगावात गुन्हे दाखल होत आहेत. यामुळे एकप्रकारे मराठी भाषिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे.
0 Comments