- विनापरवानगी कूपनलिका खोदल्यास होणार दंड
- कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत निर्णय
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत खासगी कूपनलिका खोदण्यास परवानगी घेणे आवश्यक असून विनापरवानगी कूपनलिका खोदल्यास दंड आकारून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय बोर्डाच्या बैठकीत आज घेण्यात आला.
मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट व बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली बोर्डाची सर्वसाधारण सभा आज बुधवारी पार पडली.
या बैठकीत विविध महत्वाच्या आणि सामान्य विषयांवर चर्चा करण्यात आली.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत भूजल पातळी खालावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बोर्डाच्या हद्दीतील रहिवाशांना भविष्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने पाणीसमस्येवर चर्चा करण्यात आली. बोर्डाच्या हद्दीतील कॅम्प परिसरात यापुढे कोणालाही विनापरवानगी खासगी कूपनलिका खोदता येणार नाहीत. रीतसर कॅन्टोन्मेंट बोर्डाची परवानगी घेऊनच खासगी कूपनलिका खोदल्या पाहिजेत. जर कोणी या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे.
या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी म्हणाले , आजच्या बैठकीत जमाखर्चाला मंजुरी देणे, जन्म-मृत्यू नोंदणी आदी सामान्य विषयांवर तर चर्चा झालीच, पण पाणीसमस्येसारख्या काही महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात आले. बोर्डाच्या हद्दीत पाणीसमस्या सोडविण्याच्या हेतूने काही सीएसआर प्रकल्प उभारण्यासाठी उद्योजक पुढे येत आहेत. त्यांच्या सहकार्याने तलाव खोदाई, सांडपाणी शुद्धीकरण आदी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. तसेच पावसाचे पाणी साठवण्यात येईल. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी विनापरवानगी खासगी कूपनलिका खोदाईवर बंदी घालण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नागरी वसाहतीचे बेळगाव महापालिकेत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. संरक्षण मंत्रालय आणि वरिष्ठ पातळीवर याबाबत प्रक्रिया सुरु आहे. त्याला किती वेळ लागेल हे आताच सांगता येणार नाही. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी पशुसंगोपन खात्याच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. लोक भटक्या कुत्र्यांना प्रेमाने खाऊ- पिऊ घालतात. त्याला आमची हरकत नाही, पण त्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देणे, त्यांचे निर्बीजीकरण करणे याची जबाबदारी संबंधितांवर असेल, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, बोर्डाचे सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनीही काही महत्वाच्या सूचना केल्या. आमदार राजू सेठ यांनी कॅम्प परिसरातील समस्या सोडविण्यासाठी काही महत्वाच्या सूचना करून त्यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. या बैठकीला बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments