बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला जिंकायची आहे, ती जिंकण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. आज बुधवार (दि. २० मार्च) रोजी बेळगाव दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत या जागेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघांतर्गत विधानसभा मतदारसंघात बैठका सुरू आहेत. राज्यात काँग्रेस समर्थक लाट असून आम्ही जाहीरनाम्यात दिलेल्या सर्व हमी योजनांची पूर्तता केली आहे. त्यामुळे काँग्रेसने दिलेल्या हमी योजनांची माहिती जनतेला देण्याचे काम केले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी, काँग्रेस पक्षाने राज्यात १३६ जागा जिंकल्या आहेत. बेळगाव, चिक्कोडी लोकसभेसाठी कोणताही उमेदवार असो विजयासाठी परिश्रम करूया. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाऊया, असे त्यांनी सांगितले.
तर आमदार आसिफ (राजू सेठ) म्हणाले, सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास पक्षाचा उमेदवार विजयी होण्यास मदत होईल.त्यामुळे तळागाळातून कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे.लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.पक्षाच्या विजयासाठी रात्रंदिवस काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी बेळगावमधून लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर म्हणाले,गेल्या लोकसभा निवडणुकीत थोड्या फरकाने पराभव झाला होता. मात्रही निवडणूक जिंकूया, मतदार आशीर्वाद देतील, मोठ्या फरकाने विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सभेला केपीसीसीचे सरचिटणीस सुनील हणमन्नावर, बेळगाव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी,जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्रदीप एम. जे, काँग्रेस नेते परशुराम ढगे, लिंगराज कदंब, राजू कौजलगी, दलित नेते मल्लेश चौगुले, महिला नेत्या प्रभावती मास्तमर्डी, डॉ.लक्ष्मी लोकुर, कल्पना जोशी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments