बेळगाव / प्रतिनिधी
कॅम्प येथील वाहतूक दक्षिण विभाग पोलिस स्थानकाच्या आवारात उभ्या करण्यात आलेल्या एका खाजगी आराम बसमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली अनेक शंकाकुशंका निर्माण झाल्या आहेत. याप्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. एका गुन्हेगारी प्रकरणात २०२० मध्ये कॅम्प पोलिसांनी (केए १९,युसी ४४५७ क्रमांकाची खाजगी आराम बस जप्त केली होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली, तेव्हापासून ही बस वाहतूक दक्षिण विभाग पोलिस स्थानकानजीक उभी करण्यात आली होती.
त्याच बसमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी सुमारे ४० ते ४५ वर्षीय अज्ञाताचा सडलेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. बसच्या मागील सीटवर झोपेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. बसमधून दुर्गंधी आल्याने वाहतूक दक्षिण विभाग पोलिस स्थानकात सेवेत असलेल्या एका हवालदाराने आत मध्ये पाहिले असता मृतदेह आढळून आला.
उत्तरीय तपासणीसाठी सडलेला मृतदेह बेळगाव जिल्हा रुग्णालयातील शवागारात पाठवण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतरच त्या अज्ञाताच्या मृत्यूचा उलगडा होणार आहे. घटनेची माहिती समजताच कॅम्पचे पोलिस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
0 Comments