• पोलिस आयुक्त इडा मार्टिन यांचा इशारा
  • संवेदनशील भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केली पाहणी 

बेळगाव / प्रतिनिधी 

धुलिवंदननिमित्त उद्या सोमवार (दि. २५ मार्च) रोजी परंपरेप्रमाणे बेळगाव शहर परिसरात रंगोत्सव (रंगपंचमी) साजरा करण्यात येणार आहे. मात्र उद्यापासून एसएसएलसी परीक्षेलाही सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज झाले असून रंगोत्सवा दरम्यान अनुचित प्रकार घडल्यास कठोर कारवाईचा इशारा शहर पोलिस आयुक्त इडा मार्टिन यांनी दिला आहे. तर आजपासून दोन दिवस मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. 

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने शहरातील संवेदनशील भागात ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आज सदर संवेदनशील भागांना भेटी देऊन पोलिस आयुक्त इडा मार्टिन यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासमवेत पोलिस उपायुक्त पी.व्ही.स्नेहा यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.