- अशोकनगर येथे सांडपाण्याची गंभीर समस्या
- ३५ वर्षांपूर्वी घातलेल्या ड्रेनेज पाईपलाईनची दुरवस्था
- महापालिकेचे दुर्लक्ष अन् नागरिकांना त्रास
- समस्येवर तोडगा काढण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
सांडपाणी व्यवस्थापन आणि निचऱ्याच्या योग्य नियोजनाअभावी ड्रेनेज वाहिन्या भरल्याने सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बेळगाव अशोकनगर येथील या गंभीर समस्येमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
सांडपाण्याच्या या समस्येबाबत बोलताना येथील स्थानिक रहिवासी गजानन खाडीलकर म्हणाले, सांडपाणी घरात शिरल्यामुळे घरात राहणे अवघड बनले आहे. दरवर्षी प्रामाणिकपणे कर भरून देखील महापालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत.गेल्या ३५ वर्षांपूर्वी येथे घातलेल्या ड्रेनेज पाईपलाईनची दुरवस्था झाली आहे. घुशीनी काढलेली माती, फरशी आणि पत्र्याचे तुकडे यासह इतर टाकाऊ वस्तू अडकल्याने ड्रेनेज वाहिनी ब्लॉक होऊन पाणी पुढे जाण्याचा मार्ग बंद होऊन ते पुन्हा नागरिकांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे येथील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तेव्हा महापालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली.
याप्रसंगी येथील पद्मावती मेहता या स्थानिक महिलेने सांगितले की, वास्तविक पूर्वी येथे ड्रेनेज वाहिन्या घालण्याआधी कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. आम्ही घरात नसताना ड्रेनेज वाहिन्यांसाठी चेंबर खोदण्याचे काम करण्यात आले होते. अशावेळी आमच्या स्वयंपाक घरानजीकचं चेंबर खोदल्यामुळे आता या सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाला विचारणा केली असता, कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत आम्ही कोणाकडे दाद मागायची असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
महापालिकेला कळवून देखील त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने येथील रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. घरात साचत असलेल्या सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
0 Comments