• विविध साहित्य बाजारात दाखल
  • टिमक्या - रंगांचे बालचमुंना आकर्षण  

बेळगाव / प्रतिनिधी 

होळी - धुलिवंदनाचा सण अवघ्या चार-पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात होळीचे साहित्य दाखल झाले आहे. विशेषतः पिचकाऱ्या विविध रंग, मास्क, टिमक्या साहित्याने बाजारपेठ भरू लागली आहे. त्याचबरोबर लहान बालकांना आकर्षित करणाऱ्या पिचकाऱ्या आणि विविध मास्कही पाहायला मिळत आहेत.

होळीचा सण जवळ येत आहे तसतशी बाजारात गर्दी वाढू लागली आहे. सणासाठी गुलाबी, निळा, जांभळा, भगवा, पिवळा यासह नैसर्गिक रंगांची आवक वाढली आहे. शहरातील पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार आदी ठिकाणी विविध रंगही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

साधारण २५ रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत रंग उपलब्ध आहेत. अलिकडे पावडर रंगांचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे बाजारात २५ किलोच्या पावडर बॅग सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये भगवा, हिरवा आणि इतर रंगांमध्ये पावडर विक्री केली जात आहे. ग्रामीण भागात या पावडरची विक्री अधिक होणार आहे.

त्याचबरोबर विविध आकाराच्या पिचकाऱ्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. बालचमुंना आकर्षित करतील अशा विविध रंगांमध्ये पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. २५ रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत त्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर छोट्या भीमच्या पिचकाऱ्यांचे आकर्षण ठरू लागल्या आहेत.

विविध प्रांतानुसार विविध पद्धतीने होळी हा सण साजरा केला जातो. या सणात  काही भागात टिमकी वाजवण्याची परंपरा आहे. अवघ्या चार-पाच दिवसांवर आलेल्या या सणासाठी बाजारपेठ रंगून निघाली आहे. याचबरोबर होळीच्या निमित्ताने वाजवली जाणारी टिमकी आणि टिमकी बनविणारे कारागिर उत्तरप्रदेश, बिहार मधून बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. 

टिमकी, डमरू, ढोलकी, मृदंग, काँगो यासारखे अनेक वाद्ये त्यांनी विक्रीसाठी आणली आहेत. लहान आकारातील प्लास्टिक, फायबर आणि चर्मवाद्ये बालचमुंपासून मोठ्यांना तसेच कलाकारांनाही उपयुक्त ठरतील अशी विविध आकार आणि प्रकारानुसार १५० ते २००० रू. किमतीपर्यंत वाद्ये उपलब्ध आहेत.

एकंदरीत रंगांची उधळण करणारा हा सण साजरा करण्यासाठी बाजारात खरेदीची लगबग  पहावयास मिळत आहे.

या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇