बेळगाव / प्रतिनिधी 

सण - उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. हिंदू धर्मियांचा होळी पौर्णिमा आणि मुस्लिम बांधवांचा रमजान हे दोन्ही  सण एकत्र शांततेत साजरे केले पाहिजेत. अशी सक्त सूचना पोलिस आयुक्त इडा मार्टिन यांनी केली. 

बेळगावच्या जुन्या पोलीस आयुक्तालयातील समाजभवन येथे होळी - रंगपंचमी आणि रमजान सणाच्या निमित्ताने शहर परिसरातील मुस्लिम समाजाचे नेते आणि हिंदू पंचमंडळाची शांतता बैठक घेण्यात आली. या बैठकीला कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रोहन जगदीश, वाहतूक व गुन्हे विभागाच्या  पोलिस उपायुक्त पी.व्ही.स्नेहा व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पोलिस आयुक्त इडा मार्टिन पुढे म्हणाले, रमजानचा उपवास सुरू झाल्यानंतर मुस्लिम बांधव रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. त्याशिवाय ते पहाटे लवकर उठतात. त्यामुळे शहर - उपनगरातील प्रत्येक मार्गावर सकाळ-रात्री गर्दी असते. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. यंदा पाऊस कमी झाल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळा, नैसर्गिक आणि सुक्या रंगांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.  

याप्रसंगी बोलताना पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांनी रविवार (दि. २४ मार्च) रोजी  हिंदू धर्मियांचा होळी सण साजरा होणार असून दुसऱ्या दिवशी सोमवार (दि. २५ मार्च) रोजी धुलिवंदन असल्याने शहरात सर्वत्र रंगपंचमी खेळली जाणार आहे. मात्र यंदा याच दिवशी दहावीच्या परीक्षेला सुरवात होणार असून पहिला पेपर आहे. तेव्हा सकाळी ९ ते ११ दरम्यान रंग उधळू नये, तसेच परीक्षेला जाणाऱ्या शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनी, अनोळखी मुली व महिलांवर रंग उडवू नये, अशा सूचना संबंधित भागातील पंच मंडळांनी द्याव्यात. तरुणांवर पोलिसांची नजर आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

यावेळी खडेबाजार उपविभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त शेखरप्पा, मार्केटचे सहाय्यक पोलिस आयुक्त सदाशिव कट्टीमणी आणि पोलिस अधिकारी, हिंदू व मुस्लिम समाजाचे नेते  उपस्थित होते.