हिरेबागेवाडी : बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गावात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. लग्न होऊन केवळ १० महिने झालेल्या तरुण गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिच्या पतीसह सासरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. हिना साहील बागेवाडी (वय २०) असे मृत्यू झालेल्या या तरुण विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह सात जणांविरुद्ध हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार सिद्धराय बोसगी, हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पॉक्सो कायद्यान्वये पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कोवळ्या मुलीच्या व तिच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाचा मृत्यू झाल्याने युवतीच्या कुटुंबियांना शोक अनावर झाला होता. याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना तिची आई सुमय्या यांनी, आपल्या निष्पाप मुलीची व तिच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाची हत्या पती, सासू व सासरच्या मंडळींनी केल्याचा आरोप केला. आपल्या मुलीचा छळ केला जात होता. पण मला वाईट वाटेल म्हणून ती माहेरी काहीच सांगत नव्हती. आम्ही फोन केल्यावर सासरच्यांनी बीपी कमी होऊन तूमच्या मुलीचा मृत्यू असे सांगितले. आमच्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.
मृत युवतीची मावशी भारती यांनी सांगितले की, हिनाच्या गळ्यावर दोरीने आवळलेल्या खुणा आढळल्या आहेत. तिच्या सासूने पावडर लावून त्या खुणा लपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला. आमच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. पण दुसऱ्यांची भांडी धुणे करून पोट भरणाऱ्या आपल्या आईला त्रास होईल म्हणून ती सगळे निमूटपणे सहन करत होती. तिचे लग्न होऊन केवळ दहा महिने झाले होते आणि ती चार महिन्यांची गरोदर होती. तिच्या सासरच्यांनी दोन जीवांची हत्या केली आहे. आमच्या मुलीच्या मृत्यूचा आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
मृत मुलीचे आई-वडील आणि कुटुंबीयांचा आक्रोश पाहवत नव्हता. बीम्स रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments