गोकाक : भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर सर्व विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत असून सर्वत्र भाजपला अभूतपूर्व पाठिंबा दर्शविला जात आहे. प्रचाराच्या प्राथमिक टप्प्यात जिल्ह्यातील धार्मिक संस्थानाचे अधिष्ठाते आणि महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेत त्यांचा पाठिंबा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.  

आज रविवार (दि. ३१ मार्च) रोजी आमदार रमेश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ७ मे रोजी होणारी निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न जनतेने पाहिले आहे ते साकार करण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज आतापासूनच सज्ज झाली आहे. मोदींची लाट देशभर पसरली असून केंद्रात आणखी एका टर्मसाठी आमचे सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले.

आज रविवारी जगदीश शेट्टर यांनी आमदार रमेश जारकीहोळी यांच्या गोकाक मतदारसंघातील अंकलगी, खनगाव, हुलिकट्टी, ममदापूर, उप्परहट्टी, मल्लापूर पी.जी.,सावलगी, कोन्नूर मरडीमठ, गोकाक आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या अरभावी मतदारसंघातील , कल्लोळी आणि मुदलगी शहराला भेट दिली. मला सर्व शहरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. आमदार रमेश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी हे आपापल्या मतदारसंघात मला एक लाखाहून अधिक मतांनी आघाडी मिळवून देतील असा विश्वास व्यक्त करून त्यांनी जारकीहोळी बंधूंना राज्यस्तरीय नेते म्हणून घोषित केले.

मी भाजपचे आमदार, माजी आमदार आणि विविध समाजाच्या नेत्यांची भेट घेतली आणि त्यांना माझ्या विजयासाठी मेहनत करण्याचे आवाहन केले. विरोधक विनाकारण अपशब्द काढत आहेत. बेळगावशी माझे अतूट नाते असून, गेल्या तीस वर्षांपासून या जिल्ह्यातील जनतेशी जोडलेल्या बेळगाव सुवर्णसौधाच्या उभारणीत मी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस.येडियुरप्पा यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या पक्षाने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आधीच घोषणा केली आहे. यासाठी देशातील सर्व कामगार रात्रंदिवस काम करत आहेत. पण काँग्रेस पक्षात पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून कोणाला प्रोजेक्ट केले आहे? या निवडणुकीत काँग्रेस ५० जागा जिंकण्यासाठी धडपडत आहे, असा सवाल त्यांनी केला. निकालानंतर काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येईल, असा टोला शेट्टर यांनी लगावला.

  • शेट्टर यांची जारकीहोळी बंधूंशी स्वतंत्र चर्चा : 

आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या निवासस्थानी जेवण घेतल्यानंतर जगदीश शेट्टर यांनी आमदार रमेश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी यांच्याशी सुमारे २० मिनिटे स्वतंत्र चर्चा केली. यावेळी लोकसभा निवडणुकीत शेट्टर यांच्या विजयासाठी रणनीती आखण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.जगदीश शेट्टर यांना आम्ही अरभावी आणि गोकाक मतदारसंघात बहुमताने आघाडी मिळवून देऊ , ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून शेट्टर यांना संसदेत पाठवण्याचे उद्दिष्ट असून येत्या ७ एप्रिल रोजी दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्याचे ठरले आहे, असे अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले. 

यावेळी माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार ॲड. अनिल बेनके, एम. एल. मुथेन्नावर, युवानेते अमरनाथ जारकीहोळी, सर्वोत्तम जारकीहोळी, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, गोकाकानगर मंडळ, अध्यक्ष भीमाशी भरमन्नावर, ग्रामीण मंडळ अध्यक्ष राजेंद्र गौडप्पागोळ, अरभावी मंडळ अध्यक्ष महादेव शेळकी, किरणेंद्र पाटील, मुरगेंद्रगौडा पाटील, डॉ. राजेश नेरळी, डॉ. के.व्ही.पाटील, घुळाप्पा होसमनी, गोविंदा कोप्पड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.