संकेश्वर : बंद घरात प्रवेश करून सोन्या -चांदीचे  मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ९.५ लाखांचा ऐवज लुटून चोरटा फरार झाला. संकेश्वर शहराच्या माळी गल्ली येथील रहिवासी इरफान मौलासाहेब मोमिन यांच्या घरी गत दोन दिवसांपूर्वी घडलेला हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, इरफान मौलासाहेब मोमिन हे कुटुंबासह मागील दोन दिवसांपूर्वी काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तेव्हा घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने घरफोडी करून १४१ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३० ग्रॅम (चांदी) व रोख ३.५ लाख असा एकूण ९.५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला.  

बुधवारी सकाळी इरफान मौलासाहेब मोमिन घरी परतले असता, घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. यानंतर लागलीच त्यांनी संकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच संकेश्वरचे पोलिस निरीक्षक शिवशंकर मुक्ती यांच्या मार्गदर्शनाखाली श्वानपथक व ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घराची झडती सुरू केली. 

झडतीवेळी  चोरट्याने वरच्या मजल्यावरून घरात प्रवेश करून दागिन्यांची पिशवी आणि रोख रक्कम चोरल्याचे दृष्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.  चोराने चेहरा लपवण्यासाठी मुखवटा घातला होता. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिस स्थानकात झाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.