- जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी यांची सूचना
बेळगाव / प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळामुळे शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कोणतीही सक्ती करू नये, अशी सूचना जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बँका आणि सहकारी शेतकरी संघटनांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात गुरुवारी (दि. ७ मार्च रोजी ) झालेल्या प्रमुख सहकारी संस्था आणि बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे कर्जवसुलीसाठी कोणताही दबाव आणू नये. याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी पेन्शन किंवा कोणतेही सरकारी लाभ कर्जाच्या हप्त्यांमध्ये समायोजित करू नयेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
या बैठकीत मंत्री सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शून्य व्याज कर्ज सुविधा अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता पुढील ३ महिने सक्तीची कर्जवसुली तसेच नोटिसा बजावून शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, अशा सूचना त्यांनी बँक अधिकाऱ्यांना केल्या. केवळ बँकांनीच नव्हे तर खासगी सावकारांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ, सहकारी संस्थांचे सहनिबंधक सुरेश गौडा, सहकारी संस्था उपनिबंधक एम.एन.मणी यांच्यासह शेतकरी संघटनांचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments