- बेळगाव शहर - तालुक्यात महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी
बेळगाव / प्रतिनिधी
शिव सत्य आणि सुंदर आहे... शिव अनंत आहे... शिवब्रम्ह आहे... शिव शक्ती, मुक्ती आणि भक्ती आहे. अशी श्रद्धा मनी बाळगत भगवान शंकराच्या समोर नतमस्तक होत, भाविकांनी शहर परिसरात मोठ्या भक्तीभावाने महाशिवरात्री साजरी केली. बेळगाव शहर परिसर आणि तालुक्यातील सर्व शिवमंदिरांमध्ये या निमित्ताने भाविकांची अलोट गर्दी लोटली होती.
बेळगाव येथील दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर, महादेव आर्केड येथील महादेव मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर, वीरभद्रेश्वर मंदिरात रात्री १२ वा. पासूनच महाशिवरात्रीनिमित्त विधींना सुरुवात झाली. सकाळी पूजा-अर्चा व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
बेळगावातील दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी होणारा धार्मिक आणि भक्तीमय सोहळा म्हणजे बेळगावच्या आध्यात्मिक परंपरेतील एक महत्त्वाचे पान आहे. शुक्रवारी आयोजित महाशिवरात्रीच्या सोहळ्याने याचेच अत्यंत घडवले. गुरुवारी रात्री १२ वा. पासूनच विशेष रुद्राभिषेक, होमहवन यासारख्या महाशिवरात्रीच्या विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. शहर परिसरातील भाविकांनी रात्रीपासूनच मंदिरामध्ये जाऊन बेलपत्र, फुले-फळे अर्पण केली. रात्रीच्यावेळी महाभिषेक व दुग्धाभिषेकासह पूजन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराची रुद्राक्ष पूजा बांधण्यात आली. दक्षिणकाशी मानल्या जाणाऱ्या मंदिरात कपिलनाथाचे दर्शन घेण्यासाठी सर्व परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी शिस्तबद्धरित्या रांगेतून येत भगवान शंकराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी शिवनामाचा जप आणि उपवास करून फळे व नैवेद्य दाखवून महाशिवरात्रीनिमित्त विशेष पूजा करण्यात आली.
यावेळी कपिलेश्वर देवस्थानचे विश्वस्त राजेश कलघटगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, महाशिवरात्रीनिमित्त सर्व भक्तांचे कल्याण व्हावे या भावनेने सर्वांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. अनेक भाविकांनी येऊन त्रिकालेश्वर भगवान शंकरापुढे शांतपणे नतमस्तक होऊन नमन केले. भाविकांना सुलभपणे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने विशेष व्यवस्था केली. त्यामुळे कसलाही गोंधळ गडबड नव्हता सर्वांना दर्शन घेता आले असे त्यांनी सांगितले.
महाशिवरात्रीनिमित्त शहरातील शिवालयांना जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवालयांबरोबरच उपनगरीय भागातील मंदिरे शिवभक्तांनी फुलून गेली होती. दिव्यांची मंदज्योत, अगरबत्तीचा सुवास, कापूर - धुपांचा दरवळ आणि मंदिरातील पवित्र वातावरणात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.
0 Comments