बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव  जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या  टिळकवाडी येथील मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिभा आपटे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य. एम.बी.हुंदरे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डीएड् प्रशिक्षणार्थींच्या 'हे शारदे मा' या प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख  प्रा. वर्षा महाजन यांनी  करुन दिली. पाहुण्यांच्या हस्ते  फोटोपूजन  व दीपप्रज्वलन करण्यात आले.  यानंतर प्रतिमा आपटे यांचा कॉलेजतर्फे शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार  करण्यात आला. 

विद्यार्थिनींच्यावतीने दिपीका गडकरी व प्रियांका माळवे यांनी कुसूमाग्रजांच्या कविता सादर केल्या. प्रमुख पाहुण्यांनी कुसुमाग्रज, इंदिरा संत, वसंत बापट, बहिणाबाई चौधरी, गोविंद केळकर, कृ.व. निकुंब यांच्या कविता गाऊन दाखविल्या व मराठी भाषा दिनाचे महत्त्व पटवून दिले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्यांनी कुसुमाग्रज यांच्या कविता, कादंबऱ्या, नाटके यांच्याबद्दल  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक वर्ग, डीएड्  प्रथम व द्वितीय वर्गांचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल कुकडोळकर हिने केले तर आभार रुपाली देसाई हिने मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.