बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव महापालिकेची अर्थसंकल्पीय बैठक  मंगळवारी नूतन महापौर सविता कांबळे अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत कर व अर्थ स्थायी समितीच्या अध्यक्षा वीणा विजापूरे यांनी बेळगाव पालिकेचा २०२४-२५ या वर्षाचा एकूण 43,661.35 लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मांडला. यावेळी विरोधी नगरसेवकांनी मांडलेल्या आक्षेपानंतर पुरवणी अर्थसंकल्पात तुमच्या मागण्यांनुसार तरतूद केली जाईल असे आश्वासन महापौर सविता कांबळे यांनी दिल्यानंतर सर्वानुमते अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. सदर अर्थसंकल्पात  43,661.35 लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरले असून, 43,653.63 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. खर्च वजा जाता 7.72 लाखांचे हे शिलकी अंदाजपत्रक आहे. 

या अर्थसंकल्पात मालमत्ता करातून 7350.20 लाख, इमारत बांधकाम परवानगीतून 200.00 लाख, इमारत बांधकाम परवानगी डेव्हलपमेंट चार्जमधून 1025.00 लाख, अवशेष निर्मूलनातून 230.00 लाख, हेस्कॉमकडून भूमिगत केबल जोडणीच्या शुल्कातून 1700.00 लाख, पालिका हद्दीतील रस्ते खोदाई शुल्कातून 125.00 लाख, घनकचरा संकलनातून 800.00 लाख, मालमत्ता नोंदणी अधिभार शुल्कातून 110.00 लाख असे विविध श्रोतातून एकूण 43,661.35 लाख रुपयांचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे.

खर्चात राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या राज्य वित्त अयोग्य अनुदानातून पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च, शहर सफाईसाठी 2800.00 लाख रु., थेट नेमणूक झालेल्या पौरकार्मिकांच्या वेतनासाठी 1800.00 लाख रु., शास्त्रीय घनकचरा व्यवस्थापनासाठी 400.00 लाख रु., पथदीपांच्या देखभालीसाठी 250.00 लाख रु., रस्ते, गटारी, फुटपाथ, पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी 1050.00 लाख रु., भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी 110.00 लाख रु., क्रीडा उपक्रमांसाठी 14.98.00 लाख रु.ची तरतूद करण्यात आली आहे.

भांडवली खर्चात नवे संगणक व अन्य आवश्यक साहित्य खरेदीसाठी 160.00 लाख रु., सर्व 58 प्रभागात रस्ते निर्माणासाठी 500.00 लाख रु., काँक्रीट रस्त्यांसाठी 300.00 लाख रु., गटार बांधकामासाठी 50.00 लाख रु., पालिकेच्या खुल्या जागांच्या संरक्षणासाठी 80.00 लाख रु., शहरातील चौकांच्या सौंदर्यीकरणासाठी 75.00 लाख रु. अशा मूलभूत सुविधांसाठी एकूण 1005.00 लाख रु., सर्व 58 प्रभागांत विविध आवश्यक मूलभूत सुविधांसाठी 1000.00 लाख रु., असे एकंदर सर्व मूलभूत सुविधांसाठी 2005.00 लाख रु., ड्रेनेज दुरुस्ती आणि नवीन ड्रेनेज कामांसाठी 650.00 लाख रु. अशा विविध कामांसाठी एकूण 43,653.63 लाखांचा खर्च अपेक्षित धरला आहे.