• बेळगावात वाल्मिकी समाजाचे आंदोलन
  • चन्नमासर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली  
  • जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन  

बेळगाव / प्रतिनिधी 

वाल्मिकी नायक समाजाला पर्यायी असलेल्या 'बेरड' शब्द अनुसूचित - जमातीच्या यादीत समाविष्ट करा, या मागणीसाठी बेळगाव जिल्हा वाल्मिकी समाजाच्यावतीने आज बेळगाव शहरात आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी  चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी अखिल कर्नाटक वाल्मिकी नायक महासभेचे राज्य उपाध्यक्ष आणि बेळगाव जिल्हा वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष राजशेखर तळवार म्हणाले, "आम्ही अनुसूचित जमातीशी संबंधित नसलेल्या जातींना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र जारी करताना पाहत आहोत. समाजातील तरुण किंवा युवतीची शासकीय कर्मचारी म्हणून निवड होते. मात्र जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात त्यांना अडचण येत असल्याने अनेकांना सरकारी नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

1991 मध्ये मूळ बेडर, नायक, नाईक आणि वाल्मिकी पद एकच मानून या शब्दांचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यात आला. उत्तर कर्नाटकातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दर तीनपैकी एका कुटुंबात शाळेतील नोंदीत 'बेरड' हा वेगळा शब्द आढळतो. कुटुंबातील सदस्य अनुसूचित जमातीचे असूनही तांत्रिक त्रुटीमुळे कुटुंबातील पाचपैकी दोन सदस्य अनुसूचित जातीच्या सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे वाल्मिकी नायक समाजातील मुलांवर शिक्षण व नोकरीत अतिशय अन्याय सातत्याने होत आहे. मुंबई-कर्नाटक भागात पूर्वी मराठी भाषेचा प्रभाव होता आणि त्यातील बहुतांश लोक मराठी माध्यमात शिकलेले होते.तसेच मराठी भाषिक बेडरला "बेरड" असे उच्चारतात. 

बेडर शब्दाचा अपभ्रंश होऊन बेरड शब्द आला आहे. तरीही वाल्मिकी नायक समाजाचा हा खरा पर्यायी शब्द असल्याने ज्यांच्याकडे अशी वेगवेगळी कागदपत्रे आहेत, त्यांना तत्काळ अनुसूचि जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे. तांत्रिक त्रुटीमुळे आणि मराठी भाषिकांच्या उच्चारातील फरकामुळे ही चूक झाली आहे. या त्रूटी दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली. बेडर नागरिकांच्या नातेवाईकांना न्याय देण्यासाठी तातडीची यंत्रणा असावी. सरकारमध्ये कार्यरत असलेले वाल्मिकी नायक व्यक्तींनी आपल्या समाजातील नातेवाइकांना न्याय द्यावा. नोंदणी केल्यास त्यांना अनुसूचित जातीचे उमेदवार मानले जावे, अशी मागणी केली.

यावेळी बेळगाव जिल्ह्यातील वाल्मिकी समाजाचे सरचिटणीस दिनेश चंद्रशेखर बगाडे, अखिल कर्नाटक वाल्मिकी नायक महासभेचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग नायक, संजय नायक, एस.एस. नायकर, नागराज दुंधुर, भीमराय दुर्गन्नावर, रवी नायक, सिद्राय नायक, अशोक नायक, रायक्का अंगदगट्टी, भीमप्पा नायक, सुनील कनके यांच्यासह समाजातील अनेक नेते व शेकडो महिला उपस्थित होत्या.